भाषण – 18.09.2024:- राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित केले
18.09.2024:- पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या कार्यासाठी, आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने आज एनसीपीए, मुंबई येथे आयोजित सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभास महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’चे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन्, फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ एमजे खान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.