06.05.2026 : एनसीसी, स्काऊट गाईड, माय भारत संस्थांना टीबी मुक्त भारत अभियानात सहभागी होण्याची राज्यपालांची सूचना
06.05.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी क्रीडा विभाग, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त, एनसीसी महाराष्ट्र, माय भारत, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस व गाईडस आदी संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व संस्थांना राज्यातील टीबी मुक्त भारत अभियानात सहभागी होण्याची सूचना केली. राज्यात एनसीसीचे १.२१ लाख कॅडेट्स, १७ लाख स्काऊट्स व गाईड्स तसेच माय भारत उपक्रमात १३.५० लाख युवक असून ते सर्व टीबी मुक्त भारत अभियानात सहभागी झाल्यास अभियान राज्यात यशस्वी होईल असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी अधिकाधिक युवकांना निक्षयमित्र बनवण्याची देखील सूचना राज्यपालांनी केली. क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय खेळांशिवाय राज्यातील पारंपरिक क्रीडा प्रकारांना चालना द्यावी अशी सूचना राज्यपालांनी विभागाला केली. यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट - गाईड संस्थेला राज्यात स्काऊट गाईडचे राष्ट्रीय शिबीर (जांबोरी) आयोजित करण्याची सूचना केली. स्काऊट व गाईड चळवळीला नवचैतन्य देण्यासाठी आकर्षक प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशी देखील सूचना राज्यपालांनी यावेळी केली. महाराष्ट्र एनसीसीने राज्यातील कार्याचा विस्तार करण्याचे ठरवले असून त्याकरिता मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन करावयाचे आहे. या कार्यात शासनाकडून मदत अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल त्यागी यांनी राज्यपालांना सांगितले. बैठकीला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र एनसीसीचे मेजर जनरल विवेक त्यागी, क्रीडा व युवा सेवा आयुक्त शीतल तेली-उगले, ब्रिगेडियर अरुपेंदु गुप्ता, माय भारतचे राज्य संचालक अमित पुंडे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, स्काऊट गाईडचे सचिव मिलिंद दीक्षित आदी उपस्थित होते.