बंद

    आयुष्यमान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात शुभारंभ सर्वांसाठी आरोग्य उद्दिष्ट्यपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्वपूर्ण पाऊल – राज्यपाल चे. विद्यासागर राव

    प्रकाशित तारीख: September 23, 2018

    महान्यूज

    मुंबई, दि. 23: ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार असल्याने राज्यातील 90 टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.

    झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत’ योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ करीत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात आरोग्य क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण संशोधन झाले. आयुर्मानात वाढ होऊन ते 32 वरून 70 पर्यत आले. माता आणि अर्भक मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याच्याच पुढे जाऊन ‘आयुष्मान भारत’ योजनाही सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेच्या पूर्तीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

    या योजनेतंर्गत दीड लाख वेलनेस सेंटर संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात देखील नुकतेच 4 वेलनेस सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला आहे, हे सांगताना मला आनंद होत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    या योजनेचे वैशिष्टय म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. सहज सुलभपणे रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या योसबतच ‘आयुष्मान भारत’ योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याने त्याचा फायदा 90 टक्के लोकसंख्येला होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    वैद्यकीय उपचारासाठी अनेकांना घरे, शेती गहाण ठेवावं लागतं. कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर येते. वैद्यकीय उपचाराच्या खर्चामुळे दरवर्षी 4.6 टक्के लोकसंख्या ही दारिद्य्ररेषेखाली जाते. अशावेळी ‘आयुष्मान भारत’ योजना ही वरदान ठरणार असून दारिद्यरेषेखाली जाण्याचे दृष्टचक्र थांबेल. या योजनेमुळे ग्रामीण भागाच्या आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढून रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

    आयुष्यमान भारतमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती- मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आजचा दिवस देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून झाला आहे. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा विविधप्रकारे प्रादुर्भाव जाणवत आहे. उपचार घेण्यासाठी सामान्यांना आयुष्याची कमाई लावावी लागते, मात्र देशात प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबाला उपचार मिळाला पाहिजे असा विचार करून आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेमुळे आरोग्य क्षेत्रांत क्रांती होत आहे. जगातील पहिली आरोग्य सेवा योजना अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सुरू केली होती त्यात 10 कोटी लोकांना लाभ मिळत होता मात्र आयुष्यमान भारत योजनेमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील 50 कोटी नागरिकांचा विचार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी योजना ठरणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक होण्यास मदत मिळणार आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही खासगी आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या योजनेसाठी जे वेलनेस सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत त्यामाध्यमातून शारीरिक, मानसिक व प्रतिबंधात्मक आरोग्याचा विचार करण्यात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

    समाजातील वंचित घटकाला लाभ- आरोग्यमंत्री

    आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आयुष्यमान भारत योजना ही सर्वांपर्यंत पोहोचणारी असून समाजातील वंचित घटक डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 19 लाख जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेला ई-गव्हर्नन्सचे पारितोषिक देखील मिळाले आहे. राज्यात या दोन्ही योजना एकत्रित राबविण्यात येणार असल्याने 90 टक्के लोकसंख्येला त्याचा लाभ मिळणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    झारखंड रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

    राज्यपालांच्या हस्ते राज्यातील 16 लाभार्थ्यांना ई कार्डचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या मासिक आरोग्य पत्रिकेच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.