राष्ट्रपती यांनी बापू कुटीत घालवला पाऊण तास
राष्ट्रपती यांनी बापू कुटीत घालवला पाऊण तास
- चरखा चालवण्यासोबतच महात्मा गांधींच्या स्मृतींना दिला उजाळा
- आश्रमात केली चंदन वृक्षाची लागवड
- पैसे देऊन खरेदी केले खादीचे कापड
वर्धा : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सेवाग्राम आश्रमामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमातील आदिनीवास, बा व बापू कुटी, महादेवभाई देसाई कुटीची पाहणी करून महात्मा गांधींच्या येथील वास्तव्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अंबर चरख्यावर सूत कताईचा अनुभव घेण्यासोबतच आश्रमात खादीचे कापड सुद्धा खरेदी केले. त्यांनी पाऊण तास म्हणजेच त्यांच्या निश्चित कालावधीपेक्षा 15 मिनिटे अधिक वेळ आश्रमात दिला.
आज सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी बापूकुटीला भेट दिली. त्यांच्यासमवेत श्रीमती सविता राम नाथ कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, राष्ट्रपती यांच्या कन्या स्वाती, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू उपस्थित होते.