10.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत नाशिक येथे चतुर्वेद संमेलन संपन्न
10.08.2026: महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चतुर्वेद संमेलन व धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वेदाचार्य संतोष कुमार धनपाठी, वेदाचार्य महेश रेखे धनपाठी, वेदाचार्य श्रीकृष्ण श्रौती गुरुजी, वेदाचार्य रामचंद्र जोशी, वेदाचार्य राजेश्वर देशमुख, वेदाचार्य दुर्गादास मुळे, वेदाचार्य स्व. श्याम सुंदर जोशी तसेच वेदाचार्य चि. देवव्रत रेखे यांना शाल, मानपत्र व रुपये २१,००० देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याला नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्रतिष्ठानचे संस्थापक वेदाचार्य रवींद्र पैठणे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, नाशिक येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठ परिसराचे संचालक प्रा. निलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे, पुरस्कार समितीचे सदस्य, प्रतिष्ठानचे पदाधिकारी व दिद्यार्थी आदी उपस्थित होते.