29.07.2026: राज्यपाल, अभिनेते राकेश बेदी, इन्फ्लूएंसार शिव ठाकरे यांच्या उपस्थितीत चेंबूर येथे टीबी मुक्त रॅलीचे आयोजन
29.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत आज चेंबूर मुंबई येथील श्री नारायण गुरु महाविद्यालय येथून राष्ट्रीय सेवा योजनेतील शेकडो स्वयंसेवकांची ‘जनजागृती फेरी’ काढण्यात आली. जनजागृती फेरीमध्ये राज्यपालांसह ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी व प्रसिद्ध युवा अभिनेते व प्रभावक शिव ठाकरे सहभागी झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी सर्व उपस्थितांना टीबी मुक्त मुंबई’ करण्याची शपथ दिली. युवकांच्या ‘जनजागृती फेरी’ने चेंबूर परिसरातील दाट वस्तीच्या भागांमध्ये टीबी मुक्त मुंबईचा संदेश दिला. ‘जनजागृती फेरीचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सेलने, श्री नारायण गुरु कॉमर्स कॉलेज चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिका व भामला फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, श्री नारायण मंदिर समितीचे महासचिव ओ के प्रसाद, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री वेंकटचलम व एनएसएस सेलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ सुशील शिंदे उपस्थित होते.