27.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस स्मरणोत्सव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन
27.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोकभवन, मुंबई येथे कारगिल विजय दिवस स्मरणोत्सव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते वीर माता, वीर पिता, वीर नारी, कारगिल युद्धात अपंगत्व आलेले वीर जवान तसेच शौर्य पदक विजेत्या जवानांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कवी प्रदीप यांच्या रचनेवर आधारित भरत बळवल्ली यांच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे जनरल ऑफिसर कमांडींग ले. जन.डी. एस कुशवाह, तसेच सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने वीर सेनानी फाउंडेशन तसेच स्वरनिनाद फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले होते. यावेळी नौदलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीताच्या धून सादर केल्या तसेच नचिकेत देसाई व शिवम या गायकांनी देशभक्तीपर गीते सादर केली.