10.07.2026 : राज्यपालांच्या हस्ते ‘स्टार्ट-अप फ्रंटियर १.०’ या एक दिवसाच्या स्टार्टअप प्रदर्शन व चर्चासत्राचे उदघाटन
10.07.2026: रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व आय स्पार्क फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘स्टार्ट-अप फ्रंटियर १.०’ या एक दिवसाच्या स्टार्टअप प्रदर्शन व चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी ‘एचपी क्रिएटिव्ह गेमिंग गराज’ तसेच मेट्रोपोलीस कंपनीनें विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी’ या नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे उदघाटन केले. राज्यपालांच्या उपस्थितीत आयआयटी मद्रास प्रवर्तक व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांमध्ये झालेल्या सहकार्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट दिली तसेच युवा उद्योजकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला कौशल्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, एचपी कंपनीच्या उपाध्यक्ष इप्सिता दासगुप्ता, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. वैभव नरवडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.