18.06.2026 : समाजसेवक व्ही. सतीश यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
18.06.2026 : समाजसेवक व्ही. सतीश यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व संसदीय संकुल विकास परियोजनेबाबत चर्चा केली. संसदीय संकुल विकास परियोजना ही राज्यात नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविली जात आहे. या माध्यमातून त्या भागातील गरजेनुसार स्थानिकांना कौशल्य आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. परिणामी रोजगारासाठी होणारे त्यांचे स्थलांतर थांबविण्यात यश येत असल्याची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. यावेळी सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संयोजक डॉ. गजानन डांगे, संसदीय संकुल विकास परियोजनेचे संयोजक कपिल सहस्रबुद्धे, खासदार डॉ. हेमंत सावरा, माजी खासदार डॉ. हीना गावित, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते.