बंद

    कचरा व्यवस्थापन, पाणी, प्रदूषणावर झिन्टोने काम करावे -राज्यपाल सी.विद्यासागर राव

    प्रकाशित तारीख: April 2, 2019

    कचरा व्यवस्थापन, पाणी, प्रदूषणावर झिन्टोने काम करावे -राज्यपाल सी.विद्यासागर राव

    दि. 2 एप्रिल 2019

    झिन्टो एक्सचेंज इंडिया 2020 परिषद

    कचरा व्यवस्थापन, पाणी, प्रदूषणावर झिन्टोने काम करावे

    -राज्यपाल सी.विद्यासागर राव

    मुंबई,दि. 2 : उद्याच्या सक्षम भारतासाठी झिन्टोने कचरा व्यवस्थापन, पाणी नियोजन, प्रदूषण आणि बालआरोग्याच्या प्रश्नांवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज केले.ते आज वरळी येथील नेहरु सेंटर सभागृहात झिन्टो एक्सचेंज इंडिया 2020 या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

    श्री.राव म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे देशातील मोठे उद्योग केंद्र असून देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे औद्योगिक आणि सामाजिक विकास झपाट्याने झाला असून याकामी तरुणांचा आणि महिलांचा मोठा सहभाग आहे. जगातील अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारतात तरुण वर्गांची संख्या जास्त असल्याने विविध क्षेत्रात देश प्रगती पथावर पोहोचला आहे.

    पाणी प्रश्नांवर बोलताना श्री. राव म्हणाले, जगभर पाण्याच्या प्रश्न भेडसावत आहे. त्यासाठी विविध संस्थांनी सरकार आणि अभ्यासकांसोबत काम करुन पाण्याचे नियोजन, पाण्याचा शोध आणि वापर या संदर्भात योगदान दिले पाहिजे. तापमान वाढीचा परिणाम पर्यावरणावर झाला असून त्याचा फटका पाण्याच्या स्त्रोत्राला बसला आहे. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांनी आपली वाटचाल स्वयंपूर्णतेकडे केली पाहिजे. पाणी असेल तरच उद्योगधंदे वाढतील, समाजाला चांगले आयुष्य जगता येईल. वन्यप्राणी, जंगल, पशू-पक्षी यांच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन करणे गरजेचे आहे.

    2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वधर्म समभाव, समता व बंधुत्वाचा गाभा असणारी जगातील मोठी लोकशाही भारतात आहे. याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे. देशाने उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली असून परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण वर्गाला रोजगार मिळाला आहे. विकासासाठी विजेची गरज असून त्यासाठी 175 गिगावॅट्सची विजनिर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यात अणुऊर्जा, इंधन आणि वायुंचा वापर करणे गरजेचे बनले आहे.

    सिकलसेल, ॲनेमिया आणि इतर आजार हे आदिवासी समाजात आढळून येतात. हे सर्व खर्चिक उपचार असल्याने त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगुन ते पुढे म्हणाले, हृदय रोगाचे अचून निदान करणारा आंध्रप्रदेश राज्यातील उपक्रम महत्वाचा आहे. तो लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच प्लास्टिक सफारी प्रोजेक्ट, लहान मुलांना प्लास्टिकचे दुष्परिणामाबाबत सतर्क करणारे उपक्रम सुरु करावेत. झिन्टो ग्रुप व त्यांच्या सहभागी संस्था जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सातत्याने चर्चा घडवुन उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करीत असतात. त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देवुन चेअर ऑफ इंडिया या पदावर पद्‌मभूषण राजर्षी बिर्ला यांची निवड झाल्याबद्दल श्री.राव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    यावेळी बेकर ह्युजेस कंपनीचे चेअरमन लारेन्झो सिमुलेनी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, झिन्टोचे ओसओल्ड बीजलेंड, झिन्टोच्या भारतातील प्रतिनिधी सुभासिनी चंद्रन, इंडाल्को, सेल इंडिया, टाटा, एसबीआय,सायनंट आदी उद्योग समुहाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महान्यूज डॉ.संभाजी खराट/02.04.2019