बंद

    बांगलादेश युवा संसद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 15, 2019

    बांगलादेश युवा संसद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    मुंबई भेटीने प्रभावित झाल्याची संसदपटुंची कबुली

    बांगलादेश संसदेच्या १७ युवा सदस्य तसेच राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. १५) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

    महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. उद्योग क्षेत्रात हे राज्य सर्वात अग्रेसर आहे. बांगलादेशातील अनेक विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षणासाठी येतात. त्यामुळे व्यापार संबंध वाढवितानाच बांगलादेशातील विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आदान प्रदान वाढल्यास उभयपक्षी संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास शिष्टमंडळाचे प्रमुख, खासदार नहीम रझ्झाक यांनी व्यक्त केला.

    मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून हे शहर नागरिकांसाठी व विशेषतः महिलांसाठी सुरक्षित असल्याचे पाहून आम्ही प्रभावित झालो, अशी कबुली शिष्टमंडळाच्या सदस्यांनी दिली.

    बांगलादेशाने गेल्या दशकात केलेली सामाजिक-आर्थिक प्रगती लक्षणीय आहे. महाराष्ट्र व बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच सांस्कृतिक देवाण- घेवाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास आपण कुलपती या नात्याने सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांसदीय शिष्टमंडळाला दिले.

    भारत आणि बांगलादेश जमीन, नदी, समुद्र व संस्कृतीने एकमेकांशी जोडले असून गरिबी, अविकास व अनारोग्य ही उभय देशांपुढील आव्हाने आहेत. यास्तव उभय देशांनी परस्पर सहकार्य केल्यास लोकांचे जीवनमान उंचावता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी बांगलादेश संसदेतील खासदार राझी मोहम्मद फखरूल, अल हज नझरुल इस्लाम बाबू, सध्या खासदार असलेले बांगलादेश कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार नईमूर रहमान, फहमी गुलन्दाझ बाबेल, नाटोरच्या महापौर असलेल्या हिंदू धर्मीय उमा चौधरी, बांगलादेशाचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मोहम्मद लूतफोर रहमान व ओब्झरर्वर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष धवल देसाई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

    भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओब्झरर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने या सहा दिवसांच्या भेटीचे आयोजन केले होते.