19.04.2026: पालघर जिल्ह्यात ओसरवीरा येथे राज्यपालांचे फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण
पालघर जिल्ह्यातील ओसरवीरा येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण केले. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डहाणू येथे केले.
यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
वन बंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडू लाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचे चित्र कसे बदलता येईल, यावर प्रकाश टाकला.
पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील आरोग्य सद्यस्थिती आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांविषयीची माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली.