बंद

    21.03.2026: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

    प्रकाशित तारीख : March 21, 2026
    21.03.2026:  उपराष्ट्रपती झाल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांच्यासह  विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तापुर्ण कामगिरी करणाऱ्या स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. लातूर, अहेरी व छत्रपती संभाजीनगर येथील औदयोगिक प्रशिक्षण  संस्थाना ‘सर्वोत्तम आयटीआय’ पूरस्कार देण्यात आले. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयां मध्ये व्यसन मुक्ती साठी  Say No To Drugs या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमत्र्यांनी विद्यापीठातर्फे  आयोजित कौशल्य विकास प्रदर्शनाला यांनी भेट दिली.

    उपराष्ट्रपती कार्यालय
    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

    जागतिक मनुष्यबळ केंद्र बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासात कौशल्य विकासाला अनन्यसाधारण स्थान आहे: उपराष्ट्रपती

    “पदव्यांचे रोजगारक्षमतेत रूपांतर होते, तेव्हाच त्या अर्थपूर्ण ठरतात”: उपराष्ट्रपती
    Posted On: 21 MAR 2026 4:58PM by PIB Mumbai

    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मुंबई येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना, कौशल्य विकास, रोजगार क्षमता आणि नवीन युगातील तंत्रज्ञानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की हा दीक्षांत समारंभ म्हणजे केवळ शैक्षणिक यश साजरे करणे नाही तर कुशल मनुष्यबळाचे जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी नमूद केले की विद्यापीठाची पहिली तुकडी बनून त्यांनी इतिहास रचला आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल आणि इतर राज्यांचे राज्यपाल म्हणून आपल्या पूर्वीच्या कार्यकाळाचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि शिक्षणाला उद्योगाच्या गरजांनुसार अनुरूप बनवण्यासाठी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी आपल्या अभ्यासक्रमात सातत्याने सुधारणा केल्या पाहिजेत. पदव्यांचे रोजगारक्षमतेत रूपांतर होते, तेव्हाच त्या अर्थपूर्ण ठरतात, यावर भर देत त्यांनी कौशल्य विकास व नव्या युगातील तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

    उपराष्ट्रपतींनी नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कौशल्य विकास आणि मनुष्यबळ विकासाच्या दृष्टिकोनात एक परिवर्तनकारी बदल होताना पाहिले आहे. त्यांनी स्किल इंडिया, पीएम-सेतू, स्किल इंडिया डिजिटल हब, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची स्थापना आणि व्यावसायिक प्रशिक्षणातील सुधारणा यांसारख्या प्रमुख उपक्रमांचा उल्लेख केला आणि सांगितले की या उपक्रमांनी भारत आपल्या तरुणांना भविष्यासाठी कसे तयार करतो, हे नव्याने परिभाषित केले आहे.

    उपराष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले, आणि राज्य आता आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थांबरोबर स्पर्धा करत असल्याचे नमूद केले.

    भारताच्या कार्यरत लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले की भारताची युवा लोकसंख्या योग्य कौशल्यांनी सुसज्ज झाल्यास एक मोठी ताकद बनू शकते, तसेच योग्य कौशल्यांनी सुसज्ज नसल्यास एक आव्हान देखील ठरू शकते. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना आवाहन केले की ते जिथे कुठे काम करतील तिथे त्यांनी भारताच्या प्रतिभेचे आणि क्षमतेचे राजदूत म्हणून काम करावे. त्यांची निष्ठा आणि व्यावसायिकता भारताची जागतिक विश्वासार्हता वाढवेल, असे ते म्हणाले.

    रतन टाटा यांच्या वारशासंदर्भात उपराष्ट्रपती म्हणाले की शिक्षण आणि रोजगारक्षमता यांमधील तफावत दूर करण्याची आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती घडवण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठावर आहे. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेसह उद्योगाची वाढ झाली पाहिजे, यातूनच महान नेते राष्ट्रासाठी आदर्श बनतात, असे त्यांनी नमूद केले.

    उपराष्ट्रपतींनी ‘से नो टू ड्रग्स’ या मोहिमेचा शुभारंभ केला आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत उद्योग भागीदारांनी उभारलेल्या प्रदर्शनाला भेट दिली.

    या दीक्षांत समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री मंगल प्रभात लोढा; वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
    ***
    माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर