26.02.2026: राज्यपालांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर्स ‘लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर’ पुरस्काराने सन्मानित
26.02.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्सना ‘लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील सेंटर पॉईंट हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत. निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. निरोगी समाजासाठी शुद्ध हवा, पाणी व मातीची गरज आहे त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढे येण्याची गरजही राज्यपालांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, लोकमत माध्यम समुहाचे प्रमुख विजय दर्डा, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम, आयएमएच्या अध्यक्ष मंजुषा गिरी आदी उपस्थित होते.