14.08.2025: 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस अनेक ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.
महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राने सामाजिक-आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपले राज्य उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि संस्कृती क्षेत्रांत आघाडीवर आहे.
समृद्ध आणि सर्वसमावेशक अश्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास वाटतो. देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी एकजूट होऊ या आणि स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम ठेवूया”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
राज्यपालांचे झेंडावंदन पुणे येथे
एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन शुक्रवारी (दि. 15) सकाळी 9 वाजून 5 मीनिटांनी पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावुन मानवंदना देणार आहेत.
परंपरेनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांनी सायंकाळी राजभवन, पुणे येथे निमंत्रितांसाठी चहापानाचे देखील आयोजन केले आहे.