06.08.2025: दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याच्या सूचना करणार : राज्यपाल
                                दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याच्या सूचना करणार : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्टेडियम बांधणार : दिव्यांग कल्याण मंत्री
बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगांसाठी मुंबई येथे झालेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.
‘स्पेशल ऑलिंपिक्स भारत’ या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने तीन दिवसांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे कांदिवली मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा विनामूल्य वापर करू देण्याबाबत आपण सर्व विद्यापीठांना सूचना करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी बोलताना दिले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, ‘स्पेशल ऑलिंपिक भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डा, महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, स्पेशल ऑलिंपिक भारत, महाराष्ट्र संस्थेचे सरचिटणीस डॉ. भगवान तलवारे, दिव्यांग खेळाडू मुनिरा मुर्तिझा व करण नाईक, देशातील विविध राज्यांमधून स्पर्धेसाठी आलेले दिव्यांग स्पर्धक, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि निमंत्रित उपस्थित होते.
शारीरिक तसेच बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती समाजाचे अभिन्न अंग आहेत. त्यांचा समग्र विकास झाल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्णतः साकार करता येणार नाही, असे सांगून राज्यातील दिव्यांग खेळाडूंना विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा सरावासाठी मोफत उपयोग करू द्यावा या दृष्टीने आपण विद्यापीठांना सूचना करू, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या समस्या इतर दिव्यांग व्यक्तींपेक्षा वेगळ्या व आव्हानात्मक असतात. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग मुला मुलींना समाजाकडून स्वीकृती, संधी व प्रेरणेची आवश्यकता असते. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींची काळजी ही केवळ त्यांच्या पालकांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाने त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
क्रीडा व मनोरंजन यांच्या माध्यमातून बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग मुलांचे भावनात्मक सक्षमीकरण होऊ शकते. खेळांमध्ये सहभागी झाल्यावर लोकांकडून मिळालेल्या प्रेरणेने त्यांना अधिक हुरूप येतो, असे राज्यपालांनी सांगितले.
बर्लिन येथे २०२३ साली झालेल्या विशेष ऑलिंपिक मध्ये दिव्यांग मुलांनी चमकदार कामगिरी केली होती असे सांगून २०२७ साली दक्षिण अमेरिकेतील चिली देशात होणाऱ्या विशेष ऑलिंपिकमध्ये राज्यातील व देशातील दिव्यांग मुले अधिक चांगली कामगिरी करतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील दिव्यांग मुलांच्या शाळांमध्ये खुली जिम्नॅस्टिकची उपकरणे लवकरच लावणार आहोत, असे यावेळी दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. दिव्यांग खेळाडूंसाठी नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र स्टेडियम बांधण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्पेशल ऑलिंपिक्स भारत’ ही केवळ संघटना नसून बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या समावेशनासाठी सुरू केलेले ते एक राष्ट्रव्यापी आंदोलन आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले.
देशातील दिव्यांग व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जावे, त्यांना समान अधिकार मिळावे, सन्मानाने जगता यावे व ते आत्मनिर्भर व्हावे, या दृष्टीने संस्था प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पेशल ऑलिंपिक्स भारत ही संस्था दिव्यांगांच्या क्रीडा, शिक्षण व आरोग्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पेशल ऑलिंपिक्स भारत संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या यांनी प्रास्ताविक केले, तर संस्थेचे महासचिव डॉ भगवान तलवारे यांनी आभार प्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक वितरित करण्यात आले. या स्पर्धेत २० राज्यातील बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी सहभाग घेतला होता.
Maharashtra Governor presents prizes of National Swimming Competition for the Specially Abled