06.08.2025: राज्यपालांच्या हस्ते तीन दिवसांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

06.08.2025: बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगांसाठी मुंबई येथे झालेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला. ‘स्पेशल ऑलिंपिक भारत’ या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याबाबत आपण सर्व विद्यापीठांना सूचना करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, ‘स्पेशल ऑलिंपिक भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डा, महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, स्पेशल ऑलिंपिक भारत, महाराष्ट्र संस्थेचे सरचिटणीस डॉ. भगवान तलवारे, दिव्यांग खेळाडू मुनिरा मुर्तिझा व करण नाईक, देशातील विविध राज्यांमधून स्पर्धेसाठी आलेले दिव्यांग स्पर्धक, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि निमंत्रित उपस्थित होते.