16.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस साजरा

16.05.2025 : सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत सिक्कीम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम राज्याच्या लोकसंस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर केला. विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट देखील यावेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ डी. टी शिर्के, प्रकुलगुरु पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सिक्कीमच्या चित्राचे तसेच सिक्किमी युवतीच्या रांगोळीचे राज्यपालांनी कौतुक केले.