बंद

    सैनिकांसाठी भरघोस ध्वजदिन निधी जमा करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रकाशित तारीख: December 20, 2018

    सैनिकांसाठी भरघोस ध्वजदिन निधी जमा करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    ध्वज दिनी निधी संकलन हे मोठे देशकार्यच – राज्यपाल

    मुंबई दि. 20 : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

    मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज सहयाद्री अतिथीगृह येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 2018 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, संचालक कर्नल (नि) सुहास जतकर आदी उपस्थित होते.

    माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगून राज्यपाल यावेळी म्हणाले, देशाचा विकास व जनतेमध्ये आलेली समृद्धी ही सैनिकांनी केलेल्या बलिदानामुळे आली आहे या गोष्टीचे सामाजिक भान ठेवून जनतेने सशस्त्र दल ध्वज दिन संकलनात सहभागी व्हावे. आपण सर्वांनी एकत्र येऊन सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र पुढे येऊन जास्तीत जास्त निधी संकलनासाठी प्रयत्न करावेत. सैनिकी ध्वज दिन दरवर्षी साजरा करण्यात येत असून ध्वजनिधीसाठी पैसे संकलन करणे हे मोठे समाजकार्य आहे.

    महाराष्ट्राने ध्वज निधी संकलनात आघाड़ी गेल्या ६ वर्षापासून घेतली असून ही आघाड़ी आम्ही या पुढील काळातही टिकवून ठेवू असे सांगत,संभाजी पाटील- निलंगेकर म्हणाले, सैन्यामधील 90 टक्के सैनिक हे 35 ते 40 या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे. तसेच हा संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. विविध आक्रमण आणि आतंकवादी कारवायापासून सैन्याने रक्षण केले म्हणून आपण विकासाची वाटचाल करू शकतो.

    सैनिकांनी विपरीत परिस्थितीत धीराने आणि धैर्याने मुकाबला करुन देशाची मान उंच ठेवली असून तिरंगा खाली येऊ दिला नाही. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांना सैन्याचा आणि सैनिकांचा अभिमान वाटतो. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागे सर्व देश उभा असून शहिदांच्या कुटुंबियांनी एकटे समजू नये तर या देशाची सव्वाशे कोटी जनता हेच त्यांचे कुटुंब आहे. राज्य शासनाने माजी सैनिक विभागाच्या प्रलंबित बाबी निकालात काढणयाला महत्व दिले आहे.

    ध्वज निधीसाठी सढळ हाताने निधी देणारांचा सत्कार यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच यावेळी सैन्य सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांचाही गौरव करण्यात आला.

    भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन सर्वोच्च बलिदान दिले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

    कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकल प्रवास करून एक कोटी रुपये ध्वज निधीसाठी संकलित करणाऱ्या चमूचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.