25.04.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई वायएमसीएचा १५० वा वर्धापन दिन साजरा

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई वायएमसीएचा १५० वा वर्धापन दिन साजरा
वायएमसीए सच्ची धर्मनिरपेक्ष संस्था : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएसन अर्थात वायएमसीए या संस्थेच्या नावात ‘ख्रिश्चन’ शब्द असला तरीही ही संस्था सर्व धर्म पंथातील लोकांसाठी खुली आहे. देश, भाषा, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन कार्य करणारी वायएमसीए एक सच्ची धर्मनिरपेक्ष संस्था आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे वायएमसीए या संघटनेचा १५० वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (२५ एप्रिल) एनसीपीए सभागृह मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी बॉम्बे वायएमसीएच्या ‘हाऊ मच कॅन वी डू फॉर अदर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
वायएमसीएच्या कार्याचा गौरव करताना राज्यपालांनी चेन्नई येथील वायएमसीएचे विद्यार्थी वसतीगृह कसे परवडणारे व उत्कृष्ट होते तसेच तेथील भोजनालय सुविधा अतिशय चांगली होती असे सांगितले. वायएमसीएने गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी तसेच क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आपले कार्य पुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
पूर्वी बाहेर देशात जाताना अतिशय मर्यादित परदेशी चलन मिळत असे. अश्यावेळी लंडन येथे व्यवसायानिमित्त जाताना लोक आवर्जून तेथील वायएमसीए हॉस्टेल येथे थांबत असत. अश्या प्रकारे वायएमसीएने अनेक व्यापारी उद्योजकांच्या जीवनात देखील महत्वाची भूमिका बजावल्याचे राज्यपालांनी सांगितले.
सन १८७५ मध्ये ब्रिटीश राजवट असताना बॉम्बे वायएमसीएची स्थापना झाली त्यावेळी मुंबईची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा देखील कमी होती, गेल्या दीडशे वर्षात मुंबई वायएमसीएने बरीच प्रगती केली आहे. मात्र मुंबईची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली असल्यामुळे मुंबई वायएमसीएने देखील आपले कार्यक्षेत्र वाढवणे आणि आपल्या सेवा अधिक व्यापक करणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आपल्या दीडशे वर्षांच्या प्रवासात, वायएमसीएने नेतृत्वगुण असणारे नागरिक, खेळाडू आणि सामाजिक जाणिवा असलेले व्यक्तिमत्व घडवले, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
सुरुवातीला राज्यपालांनी रोमन कॅथॉलिक चर्चचे दिवंगत प्रमुख पोप फ्रान्सिस यांना तसेच पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमाना यांनी स्वागत केले तर वर्ल्ड अलायन्स ऑफ वायएमसीएच्या अध्यक्षा सोहेला हाएक, आशिया व पॅसिफिक अलायन्स ऑफ वायएमसीएचे महासचिव नाम बू वॉन, नॅशनल कौन्सिल ऑफ वायएमसीए ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्हिन्सेंट जॉर्ज व इंडिया फेलोशिप ऑफ वायएमसीए रिटायरीजचे अध्यक्ष स्टॅन्ली करकाडा यांनी शुभेच्छापर भाषणे केली.
शतकोत्तर अर्धशतक समारोह समितीचे अध्यक्ष ऍड. रुई रॉड्रीग्स यांनी राज्यपालांचा परिचय करून दिला तर बॉम्बे वायएमसीएचे महासचिव अॅलन कोटियन यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रीय महासचिव एन. व्ही. एल्डो, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, आणि बॉम्बे वायएमसीएचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते.