14.04.2025: विकसित भारताच्या निर्मितीसाठी डॉ आंबेडकर यांना अभिप्रेत जातिविरहित समाज निर्माण करावा: राज्यपालांचे प्रतिपादन

विकसित भारताच्या निर्मितीसाठी डॉ आंबेडकर यांना अभिप्रेत जातिविरहित समाज निर्माण करावा: राज्यपालांचे प्रतिपादन
विश्वकल्याणाचा विचार करणारे डॉ. आंबेडकर सच्चे राष्ट्रपुरुष: मुख्यमंत्री
जातीयवाद हा अभिशाप असून विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी डॉ आंबेडकर यांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या भूमीने देशाला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने दोन महान सुपुत्र दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचविले तर भारतरत्न डॉ आंबेडकर यांनी समतेसाठी आपले जीवन वेचले असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
धर्म परिवर्तनाचा विचार त्यांचेपुढे आला त्यावेळी त्यांनी भारताच्या मातीत निर्माण झालेल्या बुद्ध धर्माचा अंगीकार केला, या वरुन डॉ. आंबेडकर यांची द्रष्टेपण दिसून येते, असे राज्यपालांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर भारताच्या शेजारील अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही रुजली नाही. परंतु भारत सातत्याने लोकशाही मार्गावर चालत आला, याचे श्रेय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जाते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते होते. नेहमी समाजाचा, देशाचा व विश्वकल्याणाचा विचार करणारे ते सच्चे राष्ट्रपुरुष होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताला एकसंध ठेवण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
अनेक शतकांपासून रुजलेल्या चुकीच्या रूढी व परंपरा यांच्या जोखडातून त्यांनी देशाला मुक्त केले व समानता प्रस्थापित केली, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम प्रशासक होते. कठीण परिस्थितीत शिक्षण घेताना त्यांनी समाज उत्थानाचा विचार सोडला नाही. डॉ आंबेडकर यांचे कामगार कल्याण, पाटबंधारे व ऊर्जा या क्षेत्राबद्दल चिंतन वाखाणण्याजोगे होते असे सांगून देशाच्या विकासाचा पाया रचण्याचे काम डॉ आंबेडकर यांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसह भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्यावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली, भीमज्योतीला वंदन केले तसेच उपस्थित भिक्खूंना चिवरदान केले. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना यावेळी भेटवस्तूंची वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, चैत्यभूमी स्मारक समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, भाई गिरकर, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह इतर अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.