04.02.2025: राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

04.02.2025: महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन (कलाकार विभाग २०२४ – २५) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जहांगीर कलादालन येथे संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शकुंतला कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्रण कला व दिव्यांग कलाकार या प्रवर्गातून १५ कलाकारांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, सर ज जी कला अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा राजनीश कामत, कला संचालक डॉ संतोष क्षीरसागर व प्रदर्शन अधिकारी संदीप डोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच कला प्रदर्शन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.