बंद

    13.01.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या ‘विवेक कार्यशाळेचे उदघाटन’

    प्रकाशित तारीख: January 13, 2025
    13.01.2025 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळांचा शुभारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला.  कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, रामकृष्ण मिशन धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद, स्वामी तन्नमानंद, स्वामी देवकांत्यानंद, संयोजक शंतनू चौधरी तसेच इतर साधू, विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

    विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस

    राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या ‘विवेक कार्यशाळेचे उदघाटन’

    यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळांचा शुभारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला.

    जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रती उत्तर दायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

    स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्त, भक्ती, उद्गरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्म, जाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करते, हे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

    अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

    पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा. परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासनेचे प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

    रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले.

    रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

    **