बंद

    08.01.2025: भुसावळ रेल्वेनी निर्माण केलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: January 9, 2025
    08.01.2025: राज्यपालांच्या हस्ते  मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाअंतर्गत रेल्वे क्रीडा मैदानावर नव्या सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन

    भुसावळ रेल्वेनी निर्माण केलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील
    – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही अभिनव संकल्पना

    जळगाव दि. 8 ( जिमाका ) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील तसेच ‘ हॉस्पिटल ऑन व्हील ‘ हे रेल्वेच्या डब्यात उभं केलेलं रुग्णालय ही अभिनव संकल्पना असून यामुळे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केला.

    आज भुसावळ रेल्वे विभागाच्या ‘ हॉस्पिटल ऑन व्हील ‘ आणि भुसावळ रेल्वे ग्राउंडवरील ‘नवीन सिंथेटिक ट्रॅक ‘ च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता, भुसावळ मंडळ विभागीय व्यवस्थापकप ईटी पांडे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    भुसावळसाठी ही अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक सुविधा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सुविधा आपल्या खेळाडूंना आणि क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणात सराव करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून जागतिक स्तरावर स्पर्धा करणे खर्चीक आहे, कारण क्रीडा साहित्य, प्रशिक्षण आणि प्रवास यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. नवीन निर्माण झालेली ही सुविधा या समस्यांवर काही प्रमाणात तोडगा काढेल आणि भुसावळला क्रीडा उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यास मदत करेल असे प्रतिपादन राज्यपालांनी यांनी केले.

    भारतीय रेल्वेच्या खेळाडू घडविण्याच्या परंपरेचा केला गौरव

    भारतीय रेल्वेला देशासाठी उत्कृष्ट क्रीडापटू घडविण्याचा अभिमानास्पद वारसा आहे. अनेक महान खेळाडू रेल्वेमधून पुढे आले आहेत आणि रेल्वेने आश्वासक क्रीडापटूंना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, ती परंपरा इथेही निर्माण होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ संकल्पनेचे केले कौतुक

    भुसावळ रेल्वे विभागाकडून हॉस्पिटल ऑन व्हील ‘ ही क्रांतिकारक योजना सुरु झाली ती अत्यंत अभिनव संकल्पना असून जुन्या रेल्वे डब्यांचा वापर करून हॉस्पिटल तयार करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून यामुळे जुन्या डब्यांचा पुनर्वापर होऊन दुर्गम भागांतील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवता येणार असल्याचे सांगून या संकल्पनेचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कौतुक केले.

    रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला गौरव

    सुनील शंकरम, एसएसई पथवे, बुरहानपूर दक्षिण,अनिल कुमार,एसएसई पथवे, बोदवड, छबिनाथ फौजदार, एसएसई पथवे, चाळीसगाव उत्तर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव झाला. त्या विषयी बोलताना राज्यपाल म्हणाले, भुसावळ विभागाने रेल्वेतील अनाम नायक – ट्रॅक देखभाल करणारे, म्हणजेच ‘की-मेन’ यांच्यावर काढलेले कॉफी टेबल बुक आणि त्यांचा माझ्या हस्ते केलेला सन्मान ही बाब मला खुप आनंद देणारी वाटली.त्यांचे मूक पण महत्त्वाचे कार्य कठीण परिस्थितीतही रेल्वे गाड्यांची सुरक्षितता आणि सुचारू संचालन सुनिश्चित करते. त्यांच्या मेहनतीमुळे अपघात टळतात आणि असंख्य जीव वाचतात. त्यांचा आजचा सन्मान त्यांच्या मौल्यवान योगदानाची योग्य पावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

    आमचं लहानपण ज्या ग्राउंडवर गेले आहे, त्याचे हे पालटलेले रूप पाहुन आनंद झाल्याची भावना राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बोलून दाखविली. तसेच या ग्राउंडवर एकेकाळी देशभरातील फुटबॉल, हॉकीचे खेळाडू येथे येत होते. इथे रणजी क्रिकेट सामनाही खेळला गेल्याचे स्मरण करून पुन्हा ते वैभव या मैदानाला प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि रेल्वे कडून होत असलेल्या या कार्याबद्दल कौतुक केले.

    यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता,आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक ईटी पांडे यांनी रेल्वे कडून होत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

    सिंथेटिक ट्रॅकचे उदघाटन राज्यपालांनी ‘मशाल’ पेटवून ‘ज्योती’ प्रज्वलित करून केले. ही मशाल रेल्वे शाळेतील बालक्रीडापटूंनी ट्रॅकवर फिरवत नेली, ज्यामुळे क्रीडांगणाचा उज्ज्वल भविष्यकाळ प्रतीत झाला. यावेळी धावणे आणि रिले रेस स्पर्धाही घेण्यात आली.