04.01.2025: जैन साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी घेतली राज्यपालांची भेट : व्यसनमुक्तीतून सशक्त महाराष्ट्र निर्मितीबाबत चर्चा
जैन साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी घेतली राज्यपालांची भेट : व्यसनमुक्तीतून सशक्त महाराष्ट्र निर्मितीबाबत चर्चा
युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, ड्रग्सचा वापर तसेच मोबाईल फोनचा अतिवापर या गंभीर समस्या असून व्यसनमुक्तीतून सशक्त महाराष्ट्र निर्मिती करण्याबाबत जैन तेरापंथ समाजातर्फे होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे काढले.
जैन तेरापंथ समाजाचे आचार्य महाश्रमण यांच्या शिष्या साध्वी प्रा. मंगल प्रज्ञा यांनी अन्य साध्वी तसेच अणुव्रत विश्व भारतीच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल राधाकृष्णन यांची शनिवारी (दि. ४) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
आपण तामिळनाडूमध्ये कार्य करीत असताना संपूर्ण देशाला ड्रगमुक्त करावे, देशातील पूर व अवर्षण समस्यांवर मात करण्यासाठी सर्व नद्या जोडण्यात याव्या, समान नागरी कायदा लागू करावा आदी मागण्यांसाठी १९००० किमी रथयात्रा काढली होते असे सांगून युवकांना व्यसनमुक्त करण्यासंदर्भातील सर्व उपक्रमांना आपला पाठींबा राहील असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना साध्वी प्रा मंगल प्रज्ञा यांनी डिजिटल उपकरणे व मोबाईल फोनच्या होणाऱ्या अतिवापराबाबत देखील चिंता व्यक्त केली. मोबाईल फोनचा वापर मर्यादित करावा या दृष्टीने ‘डिजिटल डिटॉक्स’ उपक्रम सुरु केल्याचे तसेच ध्यानधारणेतून उन्नतीसाठी ‘मेडिटेट टू एलिव्हेट’ उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. या उपक्रमांना शासनाने पाठबळ द्यावे अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी जैन तेरापंथी महासभेचे सदस्य किशनलाल डगलिया, अणुव्रत विश्वभारतीचे महासचिव मनोज सिंघवी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजकुमार चपलोत, सभेचे मुंबई अध्यक्ष मानेक धिंग, विनोद कोठारी, कुंदन धाकड आदी उपस्थित होते.
*****