बंद

    21.10.2024: फ्रांस भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक : जॉन मार्क सेर शार्ले

    प्रकाशित तारीख: October 21, 2024
    Consul General of France meets Governor Radhakrishnan

    फ्रांस भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक : जॉन मार्क सेर शार्ले

    आता फ्रांसमध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती

    फ्रांस भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रांस येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जात आहेत. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही असे प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले.

    वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

    आयआयटी मुंबई व फ्रांसचे इकोल पॉलिटेक्निक यांच्यात शैक्षणिक सहकार्य व विद्यार्थी परस्पर आदानप्रदान याबाबत नुकताच करार झाला असल्याचे फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

    फ्रान्सच्या अंदाजे ५००कंपन्या मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे कार्यरत असून त्याठिकाणी रोजगार निर्मिती तसेच कौशल्य वर्धन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    फ्रांस भारताशी वैज्ञानिक नवोन्मेष (इनोव्हेशन) व संशोधन क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असल्याचे सेर शार्ले यांनी सांगितले.

    २०२६ हे वर्ष फ्रांस – भारत नवोन्मेष वर्ष साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अलियान्स फ्रान्सेस ही संस्था मुंबई पुणे यांसह इतरत्र फ्रेंच भाषा अध्यापनाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    फ्रान्समध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहत असून हा समुदाय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    फ्रांस – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. भारत – फ्रांस या देशांमध्ये संरक्षण क्षेत्रापासून अनेक क्षेत्रात उत्तम सहकार्य असून ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण असणाऱ्या फ्रान्सने भारताला स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    भारत व फ्रांस दोन्ही लोकशाही राष्ट्रे असून विद्यार्थी व सांस्कृतिक आदानप्रदानामुळे उभय देशांमधील लोकांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.