10.10.2024: रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे श्री रतन टाटा हे मुकुटमणी होते.
आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रांड म्हणून प्रस्थापित केले.
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन टाटा समूहाने आपल्या उत्पादन व सेवेच्या माध्यामातून स्पर्शले, याचे श्रेय जसे टाटा समूहाचे आहे, तसेच ते रतन टाटा यांच्या व्यापक दृष्टीचे देखील आहे.
अनेक क्षेत्रात नीती मूल्यांशी तडजोड होत असताना देखील रतन टाटा यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत भारतीय नीतीमूल्यांची कसोशीने जपणूक केली.
रतन टाटा हे खर्या अर्थाने भारतीय उद्योग क्षेत्राचे ‘विवेक रक्षक’ होते. बृहत विश्व समाजाच्या शाश्वत कल्याणाचा विचार करणारे ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.
विकसित भारताचे उद्दिष्ट प्राप्त करताना त्यांनी प्रस्थापित केलेल्या विश्वास, उत्कृष्टता व नाविन्यता या मूल्यांचा प्रत्येक क्षेत्रात अंगीकार करणे, हीच टाटा त्यांना सच्ची श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.