13.09.2024:- ‘नायब’ हस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन – सी. पी. राधाकृष्णन
‘नायब’ हस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन
– सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. 13 : ‘नायब’ या हस्तकला प्रदर्शनाचे फिकी फ्लोने केलेले उत्कृष्ट आयोजन, भारतातील हस्तकला आपल्या देशाच्या समृध्द वैविध्यपूर्ण वारशाची प्रगल्भ पावती आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
हॉटेल ताज येथे नायब या हस्तकला प्रदर्शनाचे फिकी फ्लो आणि हॉटेल ताज यांच्या समन्वयातून आयोजन केले होते. यावेळी नायब प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे माजी संचालक डॉ डी. आर. कार्तिकेयन, फिकी फ्लोच्या अध्यक्ष डॉ.पायल कनोडिया, क्राफ्ट ॲण्ड मेस्ट्रोचे संचालक अजय सिंग, आकांक्षा दिक्षित यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, आपल्या पारंपरिक कला या आपली अमर्याद सर्जनशीलता आणि कौशल्याचा पुरावा आहे. आजच्या प्रदर्शनातून हेच साध्य होत आहे. आदिवासी कला ते भारताच्या कानाकोप-यातील कलाकार यामध्ये सहभागी झाले असून पदमश्री, पद्मविभूषण ही सर्वोच्च पारितोषिक प्राप्त कलाकार यामध्ये सहभागी आहेत.
राज्यपाल म्हणाले की, आपल्या सर्वोत्कृष्ट वारसा, कला आणि हस्तकला समोर आणण्यासाठी आयोजकांचे समर्पण खूप महत्वाचे आहे. आपल्या देशातील सुंदर ठिकाणे, आपली लोकसंस्कृती, आदिवासी कला नायब या प्रदर्शनीतून दिसत आहेत. या केवळ कलाकृती नाहीत तर आपला समृध्द वारसा आहे, जे आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडतात आणि आपल्या भविष्यासाठी प्रेरणा देतात. ही कला जपणारे आपले कलाकार हे आपली संपत्ती आहे. या कलांचे अस्तित्व आणि समृद्धी पुढच्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्थान मिळवून दिले. त्याचप्रमाणे या कला देखील जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठी, एक विकसित भारत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आपल्या कला भावी पिढीला माहिती व्हाव्यात आणि हा वारसा सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
यावेळी नायब या प्रदर्शनीत राष्ट्रीय स्तरावरील गोंद, बील, कर्नाटक वुड, तरकाशी, कलमकारी पेंटीग, फड पेंटींग, मिनाकारी पेंटींग, वुड क्रावींग याचे विविध 80 कला लावण्यात आल्या होत्या त्याची राज्यपाल यांनी पाहणी केली.
***
संध्या गरवारे/विसंअ/