16.08.2024- भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.– राज्यपाल
राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
लोणेरेचा 26 वा दीक्षान्त समारंभ
भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.– राज्यपाल
रायगड (जिमाका)दि.16:- भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. 2047 पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री.सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या 26 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले.
पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखाद्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले.
उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले.
मा.राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.