बंद

    12.06.2024: राज्यपालांच्या हस्ते अत्याधुनिक ब्रेल प्रिंटिंग मशीनचे उदघाटन

    प्रकाशित तारीख: June 12, 2024

    राज्यपालांच्या हस्ते अत्याधुनिक ब्रेल प्रिंटिंग मशीनचे उदघाटन

    दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे: राज्यपाल रमेश बैस

    नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो 300’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १२) संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले.

    राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर पुस्तके छापता येणार आहेत.

    तंत्रज्ञान सर्वांकरिता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींकरिता वरदान सिद्ध होत आहे. मात्र दिव्यांगांना नोकरी व्यवसायाकरिता आज नवनवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. या दृष्टीने त्यांना कौशल्याबाबत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

    दिव्यांगांना ज्ञान व कौशल्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑडिओ पुस्तके तयार केली पाहिजे तसेच ती स्वस्त व सहज उपलब्ध करून दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    नॅब इंडिया संस्थेने दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे व सर्वोत्कृष्ट दिव्यांग सहायता केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

    यावेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    ‘नॅब’ संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम तसेच इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या मार्श इंडिया, एचएसबीसी व कन्सर्न इंडिया फाउंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती देणाऱ्या एका माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

    कार्यक्रमाला नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले, कार्यवाहक मानद महासचिव डॉ. विमल कुमार डेंगला, सचिव हरेंद्र मल्लिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समिती सदस्य, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.