20.03.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत भारती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत भारती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न
शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या साहाय्याने देशाला विकसित राष्ट्र बनविणे शक्य-राज्यपाल
पुणे, दि. २०: देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या परिवर्तनकारी प्रवासात प्रत्येकाने आपली भूमिका बजावणे महत्वाचे असून शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या साहाय्यानेच हे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी भारती विद्यापीठाच्या २५ व्या पदवीदान समारंभात केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा नियंत्रक डॉ. एन्टनी रोज, व्यवस्थापन मंडळ आणि शिक्षण परिषदेचे सदस्य, विविध विभागांचे अधीष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले, पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड मानले जाण्यामध्ये येथील विविध उच्च शैक्षणिक संस्थांचे एकत्रित समर्पित प्रयत्न कारणीभूत आहेत. एक वेळी आपले आयआयटी पदवीधर आणि व्यवस्थापन पदवीधर नोकरीसाठी इतर देशात जायचे. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून या विद्यार्थ्यांना भारतातच खूप चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.
आज आपल्या आयआयटी संस्थांमध्ये विविध देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एव्हढेच नव्हे तर अबुधाबी, झांजीबार – टांझानिया, श्रीलंका आदी देशात आपल्या आयआयटी संस्था कॅम्पस सुरू करत आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या १४ आघाडीच्या विद्यापीठांच्या प्रमुखांशी आपली चर्चा झाली असून तेही भारतातील विद्यापीठांशी भागीदारी करण्यास इच्छुक आहेत. काही विदेशी विद्यापीठे भारतातही आपले कॅम्पस सुरू करत आहेत.
आपली विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी गुणवत्ता, संशोधन आणि नवोन्मेषाचा स्तर उंचावणे गरजेचे असून असे न केल्यास ती स्पर्धेत मागे पडून बंद होतील. आपले व्यवस्थापन स्नातक, अभियंते, समाजशास्त्रज्ञ, बिझनेस लीडर्स आपल्या विश्वस्तरीय फर्म, कन्सल्टन्सी, स्टार्टअप्स सुरू करतील. आपण संशोधन आणि नाविन्यता यांच्या माध्यमातून जगातील प्रभावशाली देश बनू. स्नातकांनीदेखील स्वतः संपत्तीचे निर्माते तथा स्टार्टअप चे संस्थापक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जगातील अनेक देश व्यापार आणि गुंतवणूकीसाठी चीनला एक मोठा पर्याय शोधत असून आपल्या लोकसंख्यात्मक लाभाचा फायदा भारताला होऊ शकेल. तसेच जगातील अनेक देश कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. आपण या मागणीचा लाभ मिळविण्यासाठी युवांना कौशल्य प्रदान, सध्याचे कर्मचारी यांना पुनर्कौशल्य प्रदान आणि त्यांना अद्ययावत कसे करतो यावर हे अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या देशात कृषी क्षेत्र ५० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार प्रदान करत आहे. कृषी, पशुचिकित्सा, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास आणि फलोत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असून त्यात सहभागी होण्याची गरज आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
भारती विद्यापीठाने काही खेडी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याचे तसेच या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.
पदवीदान समारंभात ५ हजार ५८५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका प्रदान करण्यात आली. यामध्ये ५६ स्नातकांना डॉक्टरेट, बेलसरे नील श्रीधर याला डॉ. के. एच. संचेती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २४, पदवीच्या २१ आणि पदविकेच्या ५ स्नातकांना सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
००००