बंद

    16.03.2024: ‘विकसित भारत’ निर्मितीसाठी आयआयटी संस्थांची भूमिका महत्वाची : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: March 16, 2024

    ‘विकसित भारत’ निर्मितीसाठी आयआयटी संस्थांची भूमिका महत्वाची : राज्यपाल रमेश बैस

    आयआयटी संस्थांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती अधिक संवेदनशील व्हावे

    स्वातंत्र्योत्तर काळात आयआयटी संस्थांचे देशविकासात मोठे योगदान राहिले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये काही आयआयटी संस्था नेहमी उच्च स्थानावर असतात. ‘विकसित भारता’चे लक्ष्य गाठताना सर्व आयआयटी संस्थांनी प्रशासन अत्याधुनिक व विद्यार्थी – स्नेही करावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक संवेदनशील व्हावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.

    मुंबई येथे आयोजित देशभरातील सर्व भारतीय प्रौद्योगिकी संस्था – आयआयटीच्या कुलसचिवांच्या दोन दिवसांच्या परिषदेच्या अखेरच्या सत्राला राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी (दि. १६) राजभवन मुंबई येथे संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

    भारतीय समाजात जातीवादाची भावना आजही आहे. त्यामुळे समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक तसेच तृतीय पंथी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आयआयटीमध्ये सर्वसमावेशक व्यवस्था असावी तसेच रॅगिंग किंवा भेदभावाला तोंड द्यावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा असावी अशी सूचना राज्यपालांनी केली.

    आयआयटी संस्थांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास २० टक्के म्हणजे तुलनेने कमी असल्याचे नमूद करून हे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावे तसेच मानव्यशास्त्र व समाज विज्ञान हे विषय देखील उपलब्ध केले जावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी आयआयटी संस्थांनी जगभरातील मेधावी विद्यार्थी संस्थांकडे आकर्षित करावे. आयआयटी संस्थांनी राज्यातील पारंपारिक विद्यापीठांना सहकार्य करावे तसेच त्यांच्या प्रशासन सुधारणेसाठी देखील मार्गदर्शक तत्वे उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.

    प्रत्येक आयआयटीचा स्वतःचा संशोधन व नाविन्यता महोत्सव असावा तसेच या महोत्सवाशी राज्यातील विद्यापीठांना देखील जोडले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    ‘जागतिक दर्जाच्या विद्यापीठ प्रशासनाची निर्मिती’ या विषयावर मुंबई आयआयटीच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी मुंबई आयआयटीचे अधिष्ठाता (प्रशासन) प्रो. नंद किशोर यांनी प्रास्ताविक केले. मुंबई आयआयटीचे कुलसचिव गणेश भोरकडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले तर विंग कमांडर प्रा. फिलिपोस यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ नयन दाभोळकर यांनी सूत्रसंचालन केले. देशभरातील १८ आयआयटीचे रजिस्ट्रार व मुंबई आयआयटी येथील उप कुलसचिव यावेळी उपस्थित होते.

    **

    Maharashtra Governor addresses Conference of IIT Registrars

    Maharashtra Governor Ramesh Bais addressed the Conference of the Registrars of Indian Institutes of Technology from across the country at Raj Bhavan Mumbai on Sat (16 Mar.)

    Addressing the registrars, the Governor asked them to make administration ultra- modern and student – friendly. He expressed the need to create a safer atmosphere for the students from rural areas and those from SCs, STs, Minority communities and transgenders. The Governor also called for efforts to increase the percentage of girl students in IITs.

    The IIT Registrars are in Mumbai to attend a two day Conference on the theme ‘Building World Class University Administration’ organized by IIT Mumbai.

    Dean (Administration) of IIT Mumbai Prof. Nand Kishore, Registrar Ganesh Bhorkade, Prof. Philipos, Dr. Nayan Dabholkar and registrars of 18 IITs were present.