बंद

    26.01.2024 : संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: January 27, 2024

    संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

    संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज या देखील उपस्थित होत्या.

    संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सध्या असलेले स्थायी सदस्यत्व आधुनिक जगाचे पुरेसे प्रातिनिधिक नाही याचेशी आपण सहमत आहोत. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व नसणे न्यायसंगत वाटत नाही, असे डेनिस फ्रान्सिस यांनी सांगितले.

    भारत हा संयुक्त राष्ट्राचा विश्वसनीय भागीदार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीस-किपींग मिशन मध्ये भारताचे योगदान सर्वात मोठे आहे व त्यामध्ये महिला शांतीरक्षकांची देखील चमू आहे असे त्यांनी सांगितले. जगात शांती नांदावी या दृष्टीने भारताची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

    आपण त्रिनिदाद टोबॅगोचे नागरिक असून ब्रायन लाराच्या आपल्या देशात सुनील गावस्कर व सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल देखील लोकांमध्ये प्रचंड प्रेम असल्याचे डेनिस फ्रान्सिस यांनी सांगितले.

    स्वातंत्र्यानंतर भारताने गेल्या ७७ वर्षात मोठी प्रगती केली असून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत आहे. संयुक्त राष्ट्र सुधारणेच्या विषयावर भारताच्या भूमिकेला अध्यक्ष या नात्याने पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.