बंद

    14.12.2023: नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह

    प्रकाशित तारीख: December 14, 2023

    नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह

    राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. १४) भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोहाचे आयोजन करण्यात आले.

    कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

    यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाइप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. मुलींच्या कवायत नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

    सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. यंदा हा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडिया येथे आज साजरा करण्यात आला.