13.09.2023 : डॉ. नीलम गोर्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकारणाची गाथा : राज्यपाल
डॉ. नीलम गोर्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकारणाची गाथा : राज्यपाल
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या राजकारणातील प्रतिभावंत व सुसंस्कृत व्यक्ती असून त्यांचे जीवन संघर्ष व समाजकारणाची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाज कार्याने अमीट ठसा उमटवला आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता त्यांचे जीवन-कार्य मार्गदर्शक आहे, असे उदगार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थित डॉ. नीलम गोर्हे यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे बुधवारी (दि. १३) प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोर्हे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, शब्दांकनकार करुणा गोखले व इतर निमंत्रित उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान मंडळात अहिल्या रांगणेकर, प्रतिभा पाटील, प्रभा राव, मृणाल गोरे यांसारख्या अनेक महिलांनी उत्कृष्ट योगदान दिले आहेत. डॉ. नीलम गोर्हे यांचे कार्य त्यांच्याच तोडीचे असून राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी यापुढेही मोठे योगदान देण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
डॉ नीलम गोर्हे या ध्येयवादी विचारसरणीच्या तसेच समाज कार्यासाठी कटिबद्ध नेत्या आहेत. आपण मुख्यमंत्री असलो तरीही आपल्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला आहे. तसेच नीलमताई गोर्हे यांनी देखील उपसभापती असून देखील महिलांच्या मदतीसाठी धावून जाणारा आपल्यातील सच्चा कार्यकर्ता जपला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. डॉ नीलम गोर्हे या खुप चांगले कार्य करीत असून त्यांचा अनेक वर्षांचा सहकारी म्हणुन आपण त्यांच्या सदैव पाठीशी राहू ,असे देखील शिंदे यांनी सांगितले. ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक माहिती नसलेले पैलू पुढे आले आहेत, याबददल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.
नीलमताई गोर्हे यांनी स्त्री आधार केंद्र तसेच युक्रांदच्या माध्यमातून केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. त्यांचे पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासाचा दस्तावेज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ हे पुस्तक आपले एकट्याचे नसून प्रत्येक कार्यकर्त्यांचे आहे, कारण या पुस्तकातील समाजकार्य अनेक व्यक्तींचे आहेत, असे नीलमताई गोर्हे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलम गोर्हे यांचे खाजगी सचिव डॉ रवींद्र खेबुडकर यांनी केले तर स्त्री आधार केंद्राच्या मुग्धा भावे केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.