बंद

    12.09.2023: तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक-राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 12, 2023

    तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक-राज्यपाल

    पुणे दि. १२: आज जगात युद्ध, विविध समूहातील तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

    साधु वासवानी मिशन पुणे द्वारा दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री देवुसिंह चौहान, आमदार सुनील कांबळे, इंदोरचे आमदार शंकर लालवाणी, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किसन कुमार शर्मा, साधु वासवानी मिशनच्या अध्यक्षा श्रीमती आर. ए. वासवानी, कार्यकारी प्रमुख कृष्णा कुमारी, डॉ. वसंत आहुजा, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाय, डाक सेवा संचालक सिमरन कौर आदी उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. बैस म्हणाले, व्यक्तीची आंतरिक शांती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाची स्थिती असताना आपल्याला अंतर्गत, बाह्य तसेच निसर्गासोबत शांतता गरजेची आहे. गौरवशाली इतिहास असणारा आपला भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वाचे मार्गदर्शन करू शकतो.

    महाराष्ट्र ही संत आणि महापुरुषांची भूमि आहे. दादा जशन वासवानी यांच्यातही संत आणि समाज सुधारकांचा समन्वय पहायला मिळतो. ते विचारवंत, लेखक आणि तत्वचिंतक होते. त्यांचे जीवन बंधुभाव, शांती, सद्भावना, करुणा आणि शांतीपूर्ण सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित होते. नैतिक मूल्य निकोप समाजासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या पैलूवर भर देण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.

    साधु वासवानी यांच्या प्रमाणेच त्यांचे सर्वात विद्वान शिष्य आणि उत्कृष्ट वक्ता असलेल्या दादा वासवानी यांनी आपल्या प्रवचन आणि लेखाद्वारे देश विदेशातील लाखो लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. ते महाराष्ट्रातील शांती आणि सद्भावनेचे दूत होते. साधु वासवानी मिशनच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि अन्य सेवाकार्य उभे केले. जात, धर्म, पंथाचा विचार न करता समाजातील सर्व घटकांची सेवा मिशनच्या माध्यमातून होत आहे, अशा शब्दात त्यांनी मिशन आणि दादा वासवानी यांच्या कार्याचा गौरव केला.

    केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौहान म्हणाले, भारताला संताची परंपरा असल्याचा आपल्याला अभिमान आहे. संत दादा वासवानी सहज आणि सरळ व्यक्तीमत्व होते. त्यांचे कार्य नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरेल असे होते. ते आध्यात्मिक गुरू होते. आज सर्वांना आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. दादा वासवानी यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचे पालन करणे आणि ते आचरणात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

    यावेळी श्रीमती वासवानी यांनी साधू वासवाणी मिशनच्या कार्याची माहिती दिली. दादा वासवानी यांचा एकात्मता, बंधुभाव, शांतता आणि अध्यात्माचा संदेश आचरणात आणणे हेच त्यांचे खऱ्या अर्थाने स्मरण आहे,असे त्या म्हणाल्या.

    यावेळी ‘नर्क से स्वर्ग तक’ या हिंदी आणि ‘स्वतः सक्षम बना’ या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले.