04.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव पुरस्कार संपन्न
04.09.2023 : राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने शताब्दी वर्ष तसेच शिक्षक दिनानिमित्त विविध ‘शताब्दी महोत्सव पुरस्कार’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. विकास सिरपूरकर, कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील योगदानाकरिता पाच व्यक्तींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ संशोधक डॉ हातिम एफ दागिनावाला, झाडीबोली व लोककला साहित्यिक डॉ हरिश्चंद्र बोरकर, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नेते प्रो. सुरेशभाऊ देशमुख, हल्दीराम समूहाचे अध्यक्ष शिवकिशन अगरवाल व मेळघाट येथे आदिवासी महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या डॉ निरुपमा देशपांडे यांना जीवनसाधना पुरस्कार देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ आर कृष्णकुमार सुवर्णपदक, प्रिन्सिपल बलराज आहेर सुवर्ण पदक, शताब्दी महोत्सव सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तसेच विद्यापीठाच्या विविध अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.