बंद

    29.08.2023: राज्यपालांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान’ प्रदान

    प्रकाशित तारीख: August 29, 2023

    राज्यातील ग्रामीण उद्योजकांचा प्रथमच राजभवन येथे सन्मान
    राज्यपालांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान’ प्रदान
    खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्ता व प्रमाणीकरणावर लक्ष्य द्यावे : राज्यपाल रमेश बैस

    खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना आज जगभरातून प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. ग्रामविकासातून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगताना खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्तेवर तसेच प्रमाणीकरणावर विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.

    राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) राज्यातील ११ ग्रामीण उद्योजकांना ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार’ राजभवन मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच ‘मेघाश्रेय फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

    खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रोत्साहनाने सातारा जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ विकसित केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करुन राज्यात मधुमक्षी पालनाला चालना देऊन अधिक मधाची गावे निर्माण करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चांगल्या फुलांची शेती केली तर त्यातून चांगले मध मिळेल व चांगले मध मिळाले तर त्याला चांगले मूल्य मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    खादीवर आधारित स्टार्टअप सुरु करावे, मुंबई येथे खादीवर आधारित ‘फॅशन शो’ चे आयोजन करावे, खादी ग्रामोद्योग उत्पादनांसाठी ई – व्यासपीठ सुरु करावे, तसेच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा, अश्या सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या.

    सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ साली होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे तसेच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती योजना आखावी अशी सूचना त्यांनी मंडळाला केली.

    आपल्या राजकीय वाटचालीत खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मोठे योगदान आहे. आपण सलग तीन वर्षे खादी यात्रा काढली व खादीचा प्रचार प्रसार केला, अशी आठवण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव असले पाहिजे. त्यातून रोजगार निर्माण होतील, असे सामंत यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढील वर्षीपासून आपले स्वतंत्र पुरस्कार सुरु करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

    खादी हा देशाचा आत्मा आहे. खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात करीत असून प्रत्येकाने किमान एक तरी खादीची वस्तू घेतली तर लोकांना रोजगार मिळेल, असे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.

    खादी म्हणजे केवळ खादीचे वस्त्र नसून, ग्रामोद्योगातून तयार झालेल्या साबणापासून शाम्पू तेल व चपलेपर्यंत खादीची व्याप्ती आहे, असे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळ सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे व त्यातून लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे असे त्यांनी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी उद्योजक होऊन रोजगार निर्माण करणारे एकनाथ जाधव (यवतमाळ), अशोक साळवी (रत्नागिरी), अक्षय कोळप (सांगली), बाळोजी माळी (उस्मानाबाद), क्षमा धुरी (सावंतवाडी), अशोक गडे (जळगाव), हर्षदा वाहने (भंडारा), जितेंद्र परदेशी, मंगेश चिवटे, सिद्धेश चौधरी व जितेंद्र हरियान यांचा ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी मंडळाच्या ‘ग्रामोद्योग’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

    कार्यक्रमाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, ‘मेघाश्रेय फाउंडेशन’च्या अध्यक्षा सीमा सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.