18.08.2023: राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची सांगता
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची सांगता
२०४७ पर्यंत किमान पाच विद्यापीठे जागतिक स्तरावर आणण्याचे राज्यपालांचे आवाहन
शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांसाठी उद्दिष्टे ठरविण्याची केली सूचना
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांकरिता आपली उद्दिष्टे निर्धारित करण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. सन २०४७ पर्यंत राज्यातील किमान पाच विद्यापीठांनी जगातील १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप पर्वानिमित्त आयोजित ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाची सांगता राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १८) राजभवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे, पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्राने देशाला स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व प्रदान केले तसेच स्वातंत्र्योत्तर काळात संसदीय लोकशाहीच्या दृढीकरणात महत्वाचे योगदान दिले असे सांगून गरिबी, उपासमारी व सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आगामी काळात विशेषत्वाने प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे तसेच कौशल्य विद्यापीठासह राज्यातील शैक्षणिक संस्थांना बळकट करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवकालीन जलदुर्गांचे जतन व संवर्धन करण्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्याचे काम शासनातर्फे केले जात असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करण्याचे तसेच विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न शासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्याचे गॅझेटिअर तयार करणार : सुधीर मुनगंटीवार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्याचे गॅझेटिअर तयार करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. येत्या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ टपाल तिकिटांचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी टपाल खात्यातर्फे शहाजी राजे भोसले यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्रातील समाज सुधारक व विचारवंत’ या मराठी पुस्तकाचे तसेच ‘स्वतंत्रता संग्राम में महाराष्ट्र का योगदान’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.