बंद

    21.06.2023 : कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यालयांमध्ये १५ मिनिटांचे योग सत्र घ्यावे: राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: June 21, 2023

    विधान भवन येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

    कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यालयांमध्ये १५ मिनिटांचे योग सत्र घ्यावे: राज्यपाल रमेश बैस

    महाविद्यालयीन युवकांना योग शिकवण्याबाबत विद्यापीठांना सूचना करणार

    कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयुष मंत्रालयाच्या योग प्रोटोकॉल नुसार १५ मिनिटांचे योग सत्र झाले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. सार्वजनिक विद्यापीठांचा कुलपती या नात्याने विद्यापीठांचे सर्व विभाग तसेच महाविद्यालयांमध्ये देखील युवकांना योग शिकविण्याबाबत आपण सूचना करु असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन येथे यंदा प्रथमच ‘योग प्रभात’ या योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या योग सत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार, शासकीय अधिकारी तसेच योगप्रेमी यांचेसह योगासने केली.

    आज योग प्रशिक्षक मिळावे याकरिता संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे असे सांगून, भारताने संपूर्ण जगासाठी योगाची शुद्धता जपणारे योग प्रशिक्षक निर्माण करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    समाजात असहिष्णुता वाढत आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक मतभेद तीव्र होत आहेत. योगाच्या माध्यमातून सहनशीलता वाढेल व इतरांचे विचार, धर्म, मान्यता व दृष्टिकोनाचा आदर करणारा शांतीपूर्ण व समंजस समाज घडू शकेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला असून आज योग ही मोठी चळवळ झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. शरीर व मनाच्या संतुलनासाठी दैनंदिन जीवनात योग आवश्यक असल्याचे सांगून योग घराघरात पोहोचविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    योग ही भारताची प्राचीन चिकित्सा पद्धत आहे. रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी योगशास्त्र हा प्रभावी उपाय आहे असे सांगून योगासनांच्या माध्यमातून ‘स्वस्थ भारत’ निर्माण व्हावा अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वागत भाषण केले तर कैवल्यधाम योग संस्थेचे सहसचिव रवी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन सत्र संपन्न झाले. जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी सुत्रसंचलन केले.