02.06.2023: राजभवन येथे प्रथमच ‘तेलंगणा राज्य दिवस साजरा
राजभवन येथे प्रथमच ‘तेलंगणा राज्य दिवस साजरा
राज्याच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे: राज्यपाल रमेश बैस
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) झालेल्या या कार्यक्रमात तेलंगणाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात आले.
तेलंगणातील लोक अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वास्तव्य करीत असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्य निर्मिती आंदोलनामध्ये व त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तेलुगू समाजाचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
भाषा, सण व सांस्कृतिक विविधतेने नटलेला भारत देश एका पुष्पगुच्छाप्रमाणे सुंदर असून देशाला आसेतु हिमाचल जोडण्यामध्ये आद्य शंकराचार्यांचे योगदान फार मोठे होते असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी तेलंगणातून आलेल्या कलाकारांचे कौतुक करताना, भाषा समजली नाही तरी संगीत व नृत्यातून भाव समजतो व सांस्कृतिक आयोजनातून परस्पर प्रेम वाढते असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’, ‘बतकम्मा’, ‘बोनालू’ व ‘ओग्गु डोलू’ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तेलंगणा शासनाच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाला तेलुगू अभिनेते हरीश कुमार यांसह तेलंगणा समाजातील श्रीनिवास सुलगे, अशोक कांटे, पोटटू राजाराम, जगन बाबू गंजी आदी उपस्थित होते.