30.05.2023: महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच गोवा राज्य स्थापना दिवस साजरा
महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच गोवा राज्य स्थापना दिवस साजरा
राज्यपालांच्या हस्ते अजित कडकडे, देवकी पंडित, सुदेश भोसले सन्मानित
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. ३०) ‘गोवा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘गोवा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र आणि गोवा ही शेजारची भावंडे असून उभय राज्ये संगीत, कला, संस्कृती व खाद्यसंस्कृतीने परस्परांना जोडली आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गोव्याने उल्लेखनीय प्रगती केली असून विकासाच्या अनेक निर्देशांकात गोवा देशातील एक क्रमांकाचे राज्य आहे.
गोव्याने देशाला भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, डॉ रघुनाथ माशेलकर, गायक रेमो फर्नांडिस, व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांसारखी अनेक रत्ने दिली असून आजही गोवेकर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत, असे सांगून राज्यपालांनी सर्व उपस्थितांना ‘गोवा राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजित कडकडे, गायिका देवकी पंडित, पार्श्वगायक सुदेश भोसले, समाजसेविका डॉ आर्मिडा फर्नांडिस, सुमन रमेश तुलसियानी (यांच्या वतीने शरद कुवेलकर), अशांक देसाई, शेफ दीपा सुहास अवचट तसेच ‘आमी गोयंकार’ संस्थेचे अध्यक्ष मोहन संझगिरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘आमी गोयंकर’ यांच्या सहकार्याने गोव्यातील नृत्य, संगीत व काव्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. साहित्यिक डॉ. घनश्याम बोरकर यांनी ‘बाकिबाब’ बा.भ. बोरकर यांच्या कविता सादर केल्या, तर सुदेश भोसले यांनी मिमिक्री सादर केली. कार्यक्रमाला मुंबईतील अनेक गोवेकर उपस्थित होते.