बंद

    16.05.2023 : आगामी काळात महिला अनेक क्षेत्रात नेतृत्व प्रदान करतील : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: May 16, 2023

    आगामी काळात महिला अनेक क्षेत्रात नेतृत्व प्रदान करतील : राज्यपाल रमेश बैस

    पोलीस दलात भरती होण्यास पूर्वी महिला उत्सुक नसत. अश्या काळात पोलीस दलात भरती होऊन उप अधीक्षक पदापर्यंत प्रवास करणाऱ्या सुनिता नाशिककर अनेक महिलांना पोलीस दलात भरती होण्यास प्रेरित करीत आहेत. आगामी काळात पोलीस दलासह समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढेल व त्या अनेक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. .

    राज्यपाल बैस यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस उप-अधिक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या ‘मी, पोलीस अधिकारी’ या पोलीस सेवेतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. १६) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    पोलीस दलात नोकरी करणे आव्हानात्मक आहे. विशेषतः महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडून दिवसातील मोठा वेळ कर्त्यव्य बजावण्यासाठी द्यावा लागतो. सार्वजनिक उत्सव, निवडणुका, गणेश विसर्जन अश्या प्रसंगी कर्तव्याच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागतो. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. कामाच्या तणावामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. परंतु आज परिस्थिती महिलांसाठी अधिक अनुकूल होत आहे असे सांगून आपल्या अनुभवांचे दस्तावेजीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी लेखिका सुनिता नाशिककर यांचे अभिनंदन केले.

    यावेळी आमदार संजय केळकर, लेखिका सुनिता नाशिककर व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.