बंद

    09.04.2023 : डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: April 9, 2023

    डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक : राज्यपाल रमेश बैस

    सायबर फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली राज्यभर लागू करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ नीलम गोऱ्हे

    सायबर गुन्ह्यांची समस्या अतिशय गंभीर : पोलीस आयुक्त

    एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व एकूणच समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    मुंबई पोलीस सायबर शाखा व इंडियन मर्चंट्स चेंबरच्या (आयएमसी) महिला शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सायबर सेफ मुंबई’ पोस्टर स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते रविवारी (दि. ९) राजभवन येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    आज ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पासवर्ड मागून खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. नोकरी, बक्षीस, विजेचे बिल भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. महिला व लहान मुलांच्या शोषणाचे देखील प्रकार घडत आहेत. गेल्यावर्षी देशात सायबर सुरक्षेसंबंधी १३.९१ लाख घटना घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्याने व जनजागृती झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    देशाची सार्वभौमता जशी महत्वाची तितकीच सायबर सार्वभौमता देखील महत्वाची आहे. अश्यावेळी प्रत्येक व्यक्तीला सायबर योद्धा बनावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

    जामताराला भेट आणि गुन्हेगारांची मदत घेण्याची सूचना

    देशातील सायबर गुन्ह्याचे केंद्र असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा या गावी आपण झारखंडचे राज्यपाल असताना भेट दिल्याचे सांगून सायबर गुन्हे करणारी मुले बरीचशी अशिक्षित असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. त्या गावात मोबाईल रेंजसाठी झाडावर चढावे लागते, असे असून देखील ते ठिकाण सायबर गुन्ह्यांचे केंद्र बनले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सायबर गुन्हेगार मुलांचे पुनर्वसन करून त्यांची पोलिसांनी मदत घेतल्यास सायबर गुन्हे थांबविण्यास मदत होईल अशी सूचना आपण तेथील मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    सायबर फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली राज्यभर लागू करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ नीलम गोऱ्हे

    सायबर गुन्ह्यांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलीस तयार करीत असलेली मार्गदर्शक प्रणाली राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर लागू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करू असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

    शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये रॅगिंग, धाकदपटशाही व लैंगिक छळणूक थांबावी या दृष्टीने देखील प्रयत्न केले जावे असे त्यांनी सांगितले. सायबर सुरक्षित मुंबई पोस्टर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस कॅडेट बनवून सायबर सुरक्षेच्या कार्याशी जोडून घ्यावे अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.

    सायबर गुन्ह्यांची समस्या अतिशय गंभीर : पोलीस आयुक्त

    सायबर गुन्हे दररोज घडत आहेत. आज प्रत्येकाच्या परिचयाची कुणीतरी व्यक्ती सायबर गुन्ह्यांची शिकार झालेली आढळते. मुंबईत ५ सायबर पोलीस स्टेशन्स आहेत आणि ९३ पोलीस स्टेशनमध्ये सायबर पोलीस कक्ष आहे, तरीदेखील ते अतिशय कमी पडत आहेत. सायबर गुन्हे ही अतिशय गंभीर समस्या असून प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक होणे आवश्यक आहे असे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी सांगितले.

    सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली (एसओपी) आपण एक महिन्यात तयार करू असे त्यांनी सांगितले.

    विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विविध शाळांमधील ३ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, असे ‘आमची मुंबई, सुरक्षित मुंबई’ उपक्रमाच्या संयोजिका भारती गांधी यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदर्श गौतम, जितेंद्र प्रजापती, मारिया शेख, जहाविका मकवाना, प्रीत खोसला व उनेझा सय्यद या पोस्टर स्पर्धा विजेत्यांना तसेच अन्य सहा उपविजेत्यांना टॅब तसेच पदक प्रदान करण्यात आले.

    बक्षीस वितरण सोहळ्याला आयएमसी महिला शाखेच्या अध्यक्ष रोमा सिंघानिया, आयएमसीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, आयएमसीच्या उपाध्यक्ष अमृता सोमैया, स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.

    स्पर्धेच्या आयोजनात ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’, ‘कोकुयो कॅम्लिन’, ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१’ व ‘किताब खाना’ यांचे देखील सहकार्य होते.