बंद

    09.03.2023: अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागावे: परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यपालांची सूचना

    प्रकाशित तारीख: March 9, 2023

    अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागावे: परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यपालांची सूचना

    लोकशाहीमध्ये प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते व त्यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात. सामान्य जनतेचा अधिकाऱ्यांवर विश्वास असणे महत्वाचे असते व त्याकरिता अधिकाऱ्यांचे जनतेप्रती आचरण चांगले असले पाहिजे असे सांगताना अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना केली.

    भारतीय पोलीस सेवेच्या २०२१ च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

    अधिकारी एकदा परीक्षा देतात व त्यानंतर त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत नाही. परंतु लोकप्रतिनिधींना दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या रूपाने जनतेचा विश्वास प्राप्त करावा लागतो. संसद सदस्य म्हणून निवडून येताना आपल्याला ७ वेळा ही परीक्षा द्यावी लागली असे राज्यपालांनी सांगितले. उत्तम अधिकारी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संविधानाचा तसेच कायदे व नियमांचा अभ्यास करणे श्रेयस्कर असते असे राज्यपालांनी सांगितले.

    प्रामाणिकपणे जनतेचा विश्वास संपादन करून समाजासाठी व देशासाठी काम केले तर लोक सदैव लक्षात ठेवतात; बदली झाल्यावर त्या अधिकाऱ्याचा मानसन्मान करतात. त्याउलट अरेरावीने वागले तर संबंधित अधिकारी बदलून गेल्यावर लोक आनंद साजरा करतात असे सांगून अधिकाऱ्यांनी आदर्श जपावे व देशाची सच्ची सेवा करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.