बंद

    08.03.2023: सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रामुळे मोठी बचत – राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

    प्रकाशित तारीख: March 8, 2023

    सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रामुळे मोठी बचत – राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

    मुंबई दि. ८ : जन औषधी केंद्रामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.

    या कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना , आरोग्य आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

    राज्यपाल बैस म्हणाले, देशातील ७६४ पैकी ७४३ जिल्ह्यात जन औषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात स्वस्तात उपलब्ध असलेल्या औषधांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. या केंद्रात १७५९ औषधे आणि २८० सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत. येत्या वर्ष अखेर पर्यंत देशभरात सुमारे दहा हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण औषधांचा लाभ मिळेल. भारतातील जनऔषधे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील प्रत्येक पाच पैकी एक व्यक्ती भारतात तयार झालेली औषधी घेते.

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार म्हणाल्या, जनऔषधी केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे अनेक रुग्णांची पैशाची बचत होत आहे. औषधांच्या किंमती कमी झाल्यामुळे अनेक औषधें सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. जन औषधी केंद्राप्रमाणेच आरोग्य साठी हेल्थ ॲड वेलनेस केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

    सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत आशा सेविकांनी खूप चांगले काम केले. त्यांच्या मानधनात वाढ करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांना औषधोपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार व्हावा.

    यावेळी जनऔषधी ज्योती, जनऔषधी सर्वश्रेष्ठ सिंबायोसिसचे अधिष्ठाता डॉ. विजय सागर, जनऔषधी मित्र म्हणून डॉ. तुषार पालवे यांना गौरविण्यात आले.
    यावेळी आशा कार्यकर्ती सुशिला भंडारे , नेत्रतज्ञ डॉ. नम्रता सोनवणे, स्त्री रोग तज्ञ डॉ. पूजा भुतडा यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल महिलादिनी सत्कार करण्यात आला.

    यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील जन औषधी केंद्राचे दूरदृश्यप्रणालीव्दारे आरोग्य
    उद्घाटन करण्यात आले.

    सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी आभार मानले.

    यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभाग प्रधान सचिव सौरभ विजय, आयुक्त धीरज कुमार ,आयुक्त अभिमन्यू काळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, जयगोपाल मेनन , सहसंचालक डॉ.गौरी राठोड ,उपसंचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. कैलास बाविस्कर डॉ.एकनाथ माले, आदी उपस्थित होते.