02.02.2023 : शानदार प्रदर्शनाबद्दल राज्यपालांकडून एनसीसी कॅडेट्सना कौतुकाची थाप
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा : राज्यपालांची एनसीसी कॅडेट्सना सूचना
शानदार प्रदर्शनाबद्दल राज्यपालांकडून एनसीसी कॅडेट्सना कौतुकाची थाप
नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये शानदार प्रदर्शन करुन अत्यंत प्रतिष्ठेचे ‘पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा खिताब पटकावल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला गुरुवारी (दि. २) राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.
दिल्लीतील अतिशय कडाक्याच्या थंडीत देखील पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत कॅडेट्सनी महिनाभर अथक परिश्रम करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याची दखल घेऊन राज्यातील एनसीसी कॅडेट्सनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेवावा अशी सूचना राज्यपालांनी केली. शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन कार्य आठवल्यास कुठल्याही आव्हानाला धैर्याने तोंड देता येईल असे राज्यपालांनी सांगितले.
समाजात शिस्तीचा अभाव असल्याचे नमूद करून एनसीसी कॅडेट्सनी कठोर परिश्रमासोबत आयुष्यभर शिस्त पाळावी व चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्र चमूला मिळालेल्या वैयक्तिक तसेच सांघिक चषकांची पाहणी केली व एनसीसी महाराष्ट्राच्या अधिकारी, प्रशिक्षक व कॅडेट्सना सन्मानित केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र एनसीसीचे अपर महासंचालक मेजर जनरल योगेंद्र प्रसाद खंडूडी, प्रशिक्षण प्रमुख कर्नल निलेश पाथरकर, महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झालेले १११ कॅडेट्स उपस्थित होते.
महाराष्ट्र एनसीसी चमूला मिळालेले सन्मान
• पंतप्रधान ट्रॉफी – सर्वश्रेष्ठ विजेता
• सर्वोत्तम निदेशालय प्रधानमंत्री रॅली
• सर्वोत्तम Cadet Sw (Navy)
• सर्वोत्तम निदेशालय( Vayu Sena Competition)
• सर्वोत्तम उद्योजक Naval Unit
• सर्वोत्कृष्ट निदेशालय (G.O.H) RDC Contingent
• सर्वोत्कृष्ट परेड कमांडर (पंतप्रधान रॅली )
• आंतर निदेशालय Flag Area competition
• सर्वोत्तम तुकड़ी ( Flying Competition)