06.11.2022 : नृत्य, कला आणि संगीत परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नृत्य, कला आणि संगीत परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.६ : देशाला नृत्य, कला आणि शास्त्रशुद्ध संगीत परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांनी केले.
नृत्य सम्राज्ञी सितारा देवी जन्म शताब्दी वर्षानिमित्त कला कृती केंद्रव्दारा आयोजित २८ व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
भवन कल्चरल सेंटरच्या अंधेरीतील स्पीजीमर सभागृहात या महोत्सवाचे रविवारी (दि.६) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कला कृती केंद्राच्या अध्यक्ष जयंती माला मिश्रा, सचिव राजेश मिश्रा आदी नाट्य कलाकार उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी संबोधित करताना म्हणाले की, “नृत्य, कला आणि संगीत क्षेत्राचा जानकार नाही. मात्र, आपल्या देशाला गेल्या अनेक काळापासून साहित्य, संगीत, नृत्य आणि कलेची परंपरा लाभलेली आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ईश्वर दर्शन देखील घडवू शकतो इतकी शक्ती या क्षेत्रात आहे. देशाला नृत्य, कला आणि शास्त्रशुद्ध संगीत परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे. केवळ मनोरंजन नव्हे तर आत्मिक समाधानही शास्त्रशुद्ध संगीतातून मिळते. जेव्हा देश-विदेशात जेव्हा अत्याचार, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या मानवी समाजाला नुकसान पोहचवणाऱ्या घटना वाढतात. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी नृत्य, संगीत व कला क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरते,” असेही राज्यपाल श्री. कोश्यारी
देशाची संस्कृती जोपासण्यात कला कृती केंद्राचे मोलाचे योगदान आहे. नृत्य सम्राज्ञी सितारा देवी आणि आचार्य चौबे महाराज यांची कला, त्यांचे ज्ञान नव्या पिढीला मिळत राहावे. या माध्यमातून देशाची वैभवशाली नृत्य आणि संगीत कला जगात प्रसिद्ध व्हावी, अशी अपेक्षा देखील राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते जयंती माला मिश्रा (कला कृती केंद्र, अध्यक्ष), राजेश मिश्रा (नाट्य कलाकार), ऋषिका मिश्रा (कथ्थक नृत्यांगना), पं. कालिनाथ मिश्रा (तबला), सोमनाथ मिश्रा (गायन), सौरव मिश्रा (कथ्थक डान्सर बनारस), गौरव मिश्रा (कथ्थक नर्तक बनारस), हिरोको सारा फुकुडा (जयंती माला मिश्राची कथ्थक नृत्यांगना जपानची विद्यार्थिनी), अपर्णा देवधर (सतार), संदीप मिश्रा (सारंगी), कुणाल पाटील (पखावाज), बालकिशन मिश्रा (अभिनेता), रवीकिशन मिश्रा (कथ्थक नर्तक), गुरु श्रीमती. केतकी तांबे, दिलीप तांबे(नृत्य निकुंज संस्था), डॉ. वैदेही रेले लाल (नालंदा नृत्य कला महाविद्यालय) या कलाकरांचा सत्कार करण्यात आला.