07.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत शासन स्तरावर बैठक घेण्याचे राज्यपालांचे आश्वासन
राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित तसेच बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत असून संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासन स्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपाल तसेच ‘नॅब’ महाराष्ट्राचे आश्रयदाते भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
नॅब संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थीनी वसतीगृहातील दृष्टिबाधित विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळत असलेले योगदान संस्थेतील सर्व मुलींना मिळावे तसेच संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बी.एड. अभ्यासक्रमाला पुनश्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी अशी अपेक्षा नॅब महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्रचे मानद सचिव गोपी मयूर, कोषाध्यक्ष विनोद जाजू, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते.