12.09.2022 : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार २०२२ प्रदान
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार २०२२ प्रदान
हुतात्मा अब्दुल हमीद यांच्या कन्येचा विशेष गौरव
अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानी सैन्याशी लढताना दाखवलेले शौर्य युवकांसाठी प्रेरणादायक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या वीरमाता, वीरपत्नी तसेच कारगिल युद्धातील जायबंदी जवानांना सोमवारी (दि. १२) राजभवन येथे ‘परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात परमवीर अब्दुल हमीद यांच्या कन्या नझबुन्निसा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जन्नत फिल्म्स या संस्थेतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
देशासाठी लढणारे वीर जवान तसेच वीरमाता यांच्यासंदर्भात बोलताना आपण निःशब्द होतो. परमवीर अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानी सैन्याशी लढताना दाखविलेले अतुलनीय शौर्य देशातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्यासारखे वीर घरोघरी जन्मले पाहिजे, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. आज देशावर पुन्हा युद्धाचे सावट ठाकले असताना आपण शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमात परमवीर चक्र विजेते संजय कुमार, मेजर जनरल राजपाल पुनिया, २६ नोव्हेंबर अतिरेकी हल्ल्यास तोंड देणारे मंगेश नाईक, कारगिल योद्धा नायक दीपचंद, अभिनेते रजा मुराद, अभिनेत्री मंदाकिनी, अभिनेते शरद मल्होत्रा, अभिनेते गोविंद नामदेव, हेमंत कुमार यांना सन्मानित करण्यात आले.
शहीद अर्जुन पिलोरे, शहीद राजू साळवे व शहीद रविंद्र पाटील यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
यावेळी अनिरुद्ध देशपांडे, जे. पी. अग्रवाल, पी. सी. सुबोधी, सय्यद अहसान अली, डॉ. महेश रमेश मुंदडा, कै. मनमोहन गुप्ता, डॉ. खालिद शेख, संजय लाब्रू, धनंजय पवार, डॉ. निखिल तारी, डॉ. बिपीन सुळे, रिया बांभनिया जैन, डॉ. अजय बक्षी, चिराग कौशिक, संतोष गौतम शिंदे, डॉ. दीपक तोष्णीवाल आदींना उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला जन्नत फिल्म्सचे निर्माता रईस खान व निवृत्त मेजर जनरल राजपाल पुनिया व्यासपीठावर उपस्थित होते.